‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती मधून उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी अर्ज दाखल; पवार विरुद्ध पवार लढाईत उडी

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती मधून उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी अर्ज दाखल; पवार विरुद्ध पवार लढाईत उडी

 


बारामती: ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यंदा बारामतीमधून निवडणूक लढवणार असून अभिजीत बिचुकले यांनी आज बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतल्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. याआधी अभिजीत बिचुकले यांनी मुंबईतील वरळी, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

राज्यात सद्या बारामती विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार लढत बघायला मिळणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहे.

बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्यांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष आहे. अशातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सुद्धा बारामती मतदारसंघात उडी घेतली असून बिचुकले बारामतीमधून विधानसभा निवडणुक लढवणार आहेत.

अभिजीत बिचुकले हे नेहमी चर्चेत असतात. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यापासून ते जास्त चर्चेत आहेत. अभिजीत बिचुकलेंनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक सुद्धा लढवली होती. त्याचप्रमाणे पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेविरोधात लढवली होती. अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढवल्या आहेत. मात्र, यामध्ये ते विजयी झाले नाहीत. त्यांना एकाही निवडणुकीमध्ये यश मिळाले नाही.