बारामतीत अजित पवार यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कन्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला
बारामती :- राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आठव्यांदा बारामती विधानसभा मतदार संघासाठी चार महिलांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार यांच्या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरिक हात उंचावून अजित पवार यांना समर्थन देत होते. तसेच स्वागत करीत होते.
मिरवणुकीच्या वेळी दादांच्या समवेत पार्थ पवार तसेच जय पवार हे देखीलउपस्थित होते. कसबा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत प्रशासकीय भवन येथे अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी लक्ष केंद्रित करीत बारामती विधानसभा मतदारसंघात झंझावात सुरू ठेवला.गावमेळावे,सभा, गाव भेट दौरे रॅलीच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचले.९ कोटी रुपयांची विकासकामे बारामती शहर व तालुक्यात कशा पद्धतीने झाली,हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.तीस-पस्तीस वर्षांत बारामतीचा झालेला विकास पाहता त्यापूर्वी बारामतीची परिस्थिती आठवली की, आपण विकासकामांमध्ये लावलेला हातभार,याचा आनंद मोठा वाटतो.आजची प्रगत बारामती पाहून समाधान वाटते.बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. अजितदादांनी यावेळी जाहीर सभेत बारामतीकरांना संबोधित केले.