साहेबांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं का ? अजित पवार यांचा सवाल : माझे घर नीट नाही म्हणून भीती वाटते

साहेबांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं का ? अजित पवार यांचा सवाल : माझे घर नीट नाही म्हणून भीती वाटते

 



काटेवाडी, दि. २८ :-आई सांगत होती, दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका, तरी देखील फॉर्म भरला. मग हे नक्की कोणाच्या सांगण्यावरून झाले. साहेबांच्या सांगण्यावरून झालं तर साहेबांनी माझे वडिल तात्यासाहेबांचं घर फोडलं का, असा सवाल अजित पवार यांनी केला. आपले घर सांभाळा, माझे घर नीट नाही म्हणून मला भीती वाटते, असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी कन्हेरी येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायला नको होती. ती माझी चूक झाली, असा उल्लेख अजित पवार यांनी पुन्हा केला. बारामतीच्या चौफेर विकासाबाबत बोलताना अजित पवार यांनी राजकीय मुद्द्यांना देखील स्पर्श केला. कौटुंबिक विषयावर बोलताना ते भावुक झाले होते.

श्रीनिवास पवार यांनी वक्तव्य नाकारले

राजकारण या विषयावर आई कधी काही बोलत नाही. अजितदादा हे वाक्य कसे बोलले, हे मला माहीत नाही, असे म्हणत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांनी केलेले वक्तव्य नाकारले. अजित पवार यांनी चूक मान्य केली असली तरीदेखील आता माघार नाही. युगेंद्र पवार यांची उमेदवारी कायम आहे. अंगाखांद्यावर ज्या बहिणीला खेळवले तिच्या विरोधात अजितदादांनी उमेदवार दिला. वेळोवेळी याबाबत मी अजित पवार यांना सांगितलं. मात्र, त्यांनी माझा निर्णय ठाम असल्याचे वेळोवेळी सांगितले. त्यामुळे त्यांनी घातलेला घाव विसरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.