आधी माझी उमेदवारी जाहीर, मग विरोधकांची : उपमुख्यमंत्री अजित पवार

आधी माझी उमेदवारी जाहीर, मग विरोधकांची : उपमुख्यमंत्री अजित पवार

 


बारामती : बारामतीतून माझ्या पक्षाने आधी माझी उमेदवारी जाहीर केली. नंतर समोरून माझ्याविरोधात उमेदवार दिला गेला. त्यामुळे मी नात्यातच लढतो आहे, या म्हणण्याला काहीच अर्थ नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्धीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, माझ्याविरोधात इथे २२ उमेदवार आहेत. मी बारामतीतून सातवेळा आमदार, एकदा खासदार झालो आहे. निवडणूक कोणतीही असली, तरी मी समोरच्याला कमी न लेखता ती लढवत असतो. मतदारांपुढे जात असतो. मतदार ठरवतील की बारामतीचे प्रतिनिधित्व कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल.
बारामतीचा विकास सगळ्यांनी मिळून केला, या शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, सगळ्यांनी विकास केला. त्यांचा मोठा वाटा असेल; पण माझा खारीचा तरी वाटा आहे ना.

लोकसभा निवडणुकीत असणारी स्थिती सध्या नाही. देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार आले आहे. केंद्राने मोठे प्रकल्प राज्याला दिले आहेत. यंदा पाऊस चांगला झाला आहे. लोकसभेवेळी दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत होता. दुधाला अनुदान, वीजबिलाची माफी, लाडकी बहीण, अशा खूप योजना दिल्या आहेत.

ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका  केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.

आत्याबाईला मिशा असत्या तर..?
भाजपसोबत जात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद पटकाविले. त्यांच्या पूर्वी तुम्ही गेला असता, तर तुम्हाला मुख्यमंत्रिपद मिळाले असते का? या प्रश्नावर अजित पवार यांनी, तुमचा प्रश्न आत्याबाईला मिशा असत्या तर? या प्रकारातला असल्याचे उत्तर दिले. मला कोणतेही चुकीचे विधान करायचे नाही. नाहीतर मूळ मुद्दा बाजूला ठेवून तीच ब्रेकिंग होईल. आम्ही निवडणुकीत वाचाळवीरांनाही गप्प बसायला सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

मी काय म्हातारा झालोय कां..?
मंगळवारी बारामती दौऱ्यात शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले होते. त्यावर अजित पवार 'हे चांगले वाटले, ' असे उत्तर दिले. तसेच शरद पवार यांनी पुढील पिढीला आता संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर हे नाही चांगले वाटले, असे अजित पवार म्हणाले. मी काय म्हातारा दिसायला लागलोय का ? अजून पाहिजे ते करायला सांगा, नाही केले तर पवार नाव सांगणार नाही, असे अजित पवार म्हणाले.