हर्षवर्धन पाटलांना नातेवाईकांनी घेरले
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
Edit
मुंबई:- राज्याच्या राजकारणातील बडे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मतदारसंघात त्यांचे नातेवाईक आणि जुन्या सहकाऱ्यांनीच घेरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हर्षवर्धन पाटील यांचे घनिष्ठ सहकारी आणि त्यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी मंगळवारी पाटील यांना रामराम ठोकला, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पाटील यांना मिळाल्याने पक्षात लोकसभेपासून असलेले त्यांचे चुलत मामा आणि इंदापूर तालुक्यातील बडे नेते आप्पासाहेब जगदाळे हेसुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आहेत. या नातेवाईकांसह गेल्या अनेक वर्षांपासून पाटील यांच्या बरोबर असलेल्या काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनीही हर्षवर्धन पाटील यांना रामराम ठोकला आहे.
पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन यांच्या कार्यशैलीवर, राजकारण, निरनिराळ्या संस्था यामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या हस्तक्षेपावर मयूरसिंह पाटील यांनी साथ सोडताना आक्षेप घेतला आहे. मागील वीस वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेचे संचालक असलेले आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे नात्याने चुलत मामा असून, त्यांनी १९९५ च्या पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीपासून त्यांची साथ दिली होती. त्यांचे धाकटे बंधू इंदापूर पंचायत समितीचे सदस्य प्रदीप जगदाळे हेदेखील पाटील यांच्यापासून दूर गेले आहेत. या तीन प्रमुख नातेवाईकांसह तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ, कर्मयोगी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, सदाशिवराव मोहोळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव खंडूजी मोहोळकर हेसुद्धा त्यांच्यापासून दूर गेले आहेत. इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष देवराज कोंडीबा जाधव, त्यांचा मुलगा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तुषार देवराज जाधव, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने, माजी सभापती दत्तात्रय फडतरे, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रताप पालवे, कर्मयोगी शंकरावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर, इंदापूर पं.स.चे माजी उपसभापती नारायण वीर, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक छगनराव बोराटे असे अनेक सहकारी पाटील यांच्यापासून दुरावले आहेत.
शरद पवार आणि माझी अवस्था सारखीचं !
पक्ष फुटल्यानंतर ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवारांची जी अवस्था झाली होती, तीच आज माझी झाली आहे. शरद पवारांनी गेल्या पन्नास वर्षांत अनेक मोठे नेते तयार केले; परंतु वेळ आल्यानंतर तेच त्यांना सोडून गेले. त्यांना एकटे पाडले, मीसुद्धा तालुक्यात अनेक जणांना तयार केले; परंतु ते सोडून गेले. इंदापूरची जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी डगमगणार नाही, असा आत्मविश्वास हर्षवर्धन पाटील यांनी या घडामोडींवर व्यक्त केला आहे.