मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही - अजितदादांची मतदारांना भावनिक साद
बारामती:- राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे प्रचारचे शेवटचे दिवस राहिले असल्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. बंडखोरीच्या राजकारणानंतर राज्यातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे भविष्य ठरवणारी तसेच राज्याचे राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. त्यापूर्वी आता अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे. तसेच अजित पवार यांनी मतदारांना भावनिक साद देखील घातली आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्येच लढत होणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी नवा उमेदवार दिला आहे. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीकर दादा म्हणून कोणाला कामाची संधी देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार प्रचार, सभा व भेटीगाठी घेतल्या आहेत. आज (दि.17) हे गावागावांमध्ये भेटी देत आहेत. अजित पवार यांनी गावभेटीवेळी मतदारांना आवाहन केले.
अजित पवार म्हणाले की, “माळेगावमधील काही पुढारी चुकीचं काम करतायेत. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायचं असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो. त्यावेळी याठिकाणी काय होतं, कुसळं यायची. आता काय परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या. साहेबांचा आदर राखून ताईंना साथ दिली. आता मला साथ द्या, लोकांना वाटत होतं की मी शरद पवार साहेबांना मी सोडायला नको होतं. परंतु मी साहेबांना सोडलं नाही. सर्व आमदारांच्या सह्या होत्या,” असे विधान अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
पुढे अजित पवार बारामतींकरांना म्हणाले की, “मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत. ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे. पुढच्या पिढीसाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा. मी न मागता सगळं करतोय. याची तुम्हाला किंमत कळत नाही. मी कॅनॉलचं पाणी आणलं नसतं, तर ऊसाचं पाचट झाली असती. विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे.. पवार साहेबांनी रिटायर झाले मग बारामती कडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांला साथ दिली. आता मला साथ द्या,” असे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केले आहे.