मयूरसिंह पाटील यांचा  प्रवीण माने यांना पाठिंबा

मयूरसिंह पाटील यांचा प्रवीण माने यांना पाठिंबा

 


इंदापूर --(तानाजी काळे)  इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी आज इंदापूरचे अपक्ष  उमेदवार प्रवीण माने यांच्या परिवर्तन विकास आघाडीत प्रवेश करून प्रवीण माने यांना आपल्या समर्थकांसह पाठिंबा जाहीर केला.

दोन दिवसापूर्वीच नात्याने पाटील यांचे मामा व पुणे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर पाठिंबा दिला असून मंगळवारी (आज) ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. 

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत श्री. पाटील यांच्या नात्यातल्याच पदावर असलेल्या व विविध पदावर काम केलेल्या या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडल्याने पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे मानले जात आहे. 
लोकनेते माजी खासदार कै. शंकरराव पाटील हे माझे चुलते असून आमच्या काकांचे काम उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांनी दाखवलेल्या विचाराने अलीकडच्या काळामध्ये तालुक्यामध्ये काम होत नसल्याने आपली वैचारिक व राजकीय  पातळीवर घुसमट झाली. तालुक्यातील लोकांच्या भविष्याचा विचार करून सोनाई उद्योग समूह समर्थपणे उभा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबातील प्रवीण माने यांच्यासारख्या तरुणाला पाठिंबा देण्यासाठी मी परिवर्तन विकास आघाडीत प्रवेश करीत असल्याचे मयुरसिंह पाटील यांनी माध्यमाशी  बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, कै. शंकरराव पाटील यांचे अनेक वारसदार आहेत. त्यांनी हर्षवर्धन पाटील  यांना आमदार केले. मंत्री केले. परंतु त्यांनी  आम्हीच त्यांचे वारसदार आहोत असे दाखवण्याच्या प्रयत्न करीत आहेत. स्वर्गीय शंकराव पाटील यांच्या कन्या श्रीमती पद्माताई भोसले यांच्यावर सुद्धा सातत्याने राजकीय पातळीवर अन्याय झाला. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आज पर्यंत आम्ही  शंकरराव पाटील यांच्या विचाराने तालुक्यामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून काम करीत असताना आमच्या कुटुंबाकडे तालुक्यातील लोक आदराने पाहत होते. परंतु ज्यांच्यावर तालुक्याने विश्वास ठेवला. ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाने विश्वास टाकला. त्या कुटुंब प्रमुखाचीच कुटुंबाची व्याख्या हे अत्यंत मर्यादित अशी आहे. असा आरोप करीत  हर्षवर्धन पाटील हे प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलत असल्याने शंकरराव पाटील यांच्या विचारधारेला त्यांनी तिलांजली दिल्याने अशा परिस्थितीत आम्ही तेथे काम करू शकत नसल्याने.  मी त्यांचा  पक्ष आणि त्यांचे विचा सोडून इंदापूर तालुक्याच्या भविष्यासाठी परिवर्तन विकास आघाडीत प्रवेश केला आहे . पुढील काळातही आपण माने यांच्याबरोबरच काम करणार आहे. असे त्यांनी सांगितले.