राजकीय घडामोडींना वेग ! महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार; शिंदे दिल्लीला जाणार
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरून असलेला सस्पेंस आज संपणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजप ज्यांना मुख्यमंत्री बनवणार आहे त्यांना शिवसेना पाठिंबा देईल, अशी घोषणा काल एकनाथ शिंदे यांनी केली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा प्रत्येक निर्णय स्वीकारणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी ४ वाजता दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सायंकाळी साडेपाच वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून स्वत: माघार घेतली आहे. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपमध्ये बैठका सुरू आहेत. बुधवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात सुमारे ४० मिनिटे बैठक चालली. दरम्यान, आज सायंकाळी पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शाह बैठक घेणार आहेत.
सध्याच्या एकूणच हालचाली बघता मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच असेल, असे मानले जाते. मात्र, ऐन वेळी दुसरेच नाव समोर येणार नाही ना, अशी शंका फडणवीस यांच्या चाहत्यांमध्ये आहे.