आजी-माजी आमदारांंच्यापुढे  इंदापुरात प्रवीण माने यांचे कडवे आव्हान

आजी-माजी आमदारांंच्यापुढे इंदापुरात प्रवीण माने यांचे कडवे आव्हान

 

इंदापूर (तानाजी काळे): पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक २४ उमेदवार इंदापूर विधानसभा मतदार संघांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असून यातील तीन उमेद वारांमध्ये प्रमुख लढत होतांना दिसत आहे.

‌राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटातील महायुतीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे मामा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवार ) गटाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अपक्ष उमेदवार सोनाई उद्योग समूहाचे संचालक,जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यामध्ये अटीतटीची  व लक्षवेधी तिरंगी लढत होत आहे.

या निवडणुकीच्या रिंगणात आजी-माजी आमदार एकमेकां समोर भिडले असतांनाच या दोन्ही उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत नवखे असलेल्या प्रवीण माने यांनी दोन्ही उमेदवारांना कडवे आव्हान दिले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूरसिंह पाटील,मामा अप्पासाहेब जगदाळे व अन्य संस्थांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्याने विरोधकांचे  बरोबरच स्वकियांच्या वेगवेगळ्या वक्तव्याचाही सामना पाटील यांना करावा लागत आहे.

    पाटील यांच्या प्रचारासाठी पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे पुत्र राजवर्धन  व पत्नी भाग्यश्री पाटील याही रणांगणात उतरले असून तेही  प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

     विधानसभेच्या तीन निवडणुकीचा अनुभव त्याचबरोबर त्यांना मिळालेले मंत्रीपद अजित पवारांचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांचा संच घेऊन भरणे यांनी प्रचाराची दमदार सुरुवात केली आहे.

    आजी माजी आमदारांचा प्रचार सुरू होण्यापूर्वी माने कुटुंबातील सर्व सदस्य प्रचारा साठी घराबाहेर पडून प्रचाराची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केली असून प्रवीण माने युवा कार्यकर्त्यांचा संच बरोबर घेऊन गावोगावी प्रचार सभा घेऊन आपली भूमिका ते मांडत आहेत.

      ठिकठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत आहे. गावोगावी घोड्यावरून मिरवणूक काढली जात आहे. तरुण उत्साही कार्यकर्त्याची फौज घेऊन माने यांनी प्रचाराची रंगत वाढविली असल्याचे दिसून येत आहे.

     माने यांनी भांडगाव,भोडणी, लाखेवाडी,सुरवड आदी ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी बोलतांना ते म्हणाले,इंदापूर तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणा मध्ये नैसर्गिक साधनसामग्री असताना सर्व गोष्टी अनुकूल असतांना, तालुक्याचा अपेक्षित विकास झाला नाही.

   माने कुटुंबाने बावीस वर्षांपर्वी उग्र स्वरूप धारण केलेला  दुधाचा प्रश्न सोडवला.हजारो दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचं काम माझे वडील दशरथ माने यांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या सभापती पदी काम करीत असतांना अनेक कामे परिसरामध्ये केलेली आहेत .तालुक्याचा सर्वांगीणक विकास करण्यासाठी मला पाच वर्षे कामाची संधी द्यावी. असे आवाहन करून 

  माने पुढे म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये उसाच्या दराचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. ऊसाला रास्त बाजार भाव मिळत नाही . शेतीच्या  पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खडकवासला,नीरा डावा  कालव्याची आवर्तने व्यवस्थित मिळत नाहीत.तलाव वेळेवर भरले जात नाहीत.

     अनेक उपसा जलसिंचन  योजना प्रलंबित आहे .या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन.

   आमच्या कुटुंबाची काम करण्याची पद्धत इंदापूर तालुक्याला माहित आहे. सोनाई उद्योग समूहाने शून्यातून विश्व निर्माण केले .आज इंदापूर तालुक्यामध्ये अनुकूल परिस्थिती असतानाही अपेक्षित विकास झाला नाही.

    सोनाई उद्योग समूह जसा शून्यातून उभा केला.तसा आगामी काळामध्ये इंदापूर तालुका सुजलाम सुफलाम केल्याशिवाय माने कुटुंब गप्प बसणार नाही. 

 अनेक शासकीय योजना तालुक्यात आणल्या जातील , जिथे शासनाचा निधी मिळाला नाही. तिथे व्यक्तिगत खर्चाने तरुणांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा करून त्यांचे भवितव्य उज्ज्वल केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

      दत्तात्रय भरणे-मामा यांनी गेल्या दहा वर्षात आपण सहा हजार कोटी रुपयांची विकास कामे केली असून या कामांच्या जोरावरच मतदार आपल्याला पुन्हा निवडून देतील असा विश्वास व्यक्त करीत आहेत.

       गेल्या दहा वर्षांमध्ये निकृष्ठ दर्जाचे कामे इंदापूर तालुक्यात झाली असून मलिदा गॅंग तयार झाली आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून पडलेल्या २६ हजाराच्या मताधिक्याच्या भरोशावर श्री. पाटील विजयाचे अपेक्षा बाळगून आहेत.

   आज आजी-माजी आमदार असं अपक्ष उमेदवार प्रवीण माने या तिघांनाही विजयाची खात्री असून इंदापूर तालुक्यातील मतदार विजयाचा लंबक कोणाकडे झुकवणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.