‘बारामती पॉवर मॅरेथॉन’साठी १५ डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल
शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४
Edit
बारामती, दि. १२: 'बारामती पॉवर मॅरेथॉन' स्पर्धेचे १५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात येणार असून त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
पुनीत बालन ग्रुपच्यावतीने 'बारामती पॉवर मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनसाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत शहर व परिसरातील वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व प्रकारची वाहतुकीकरीता आदेश लागू राहणार आहे.
बारामती शहरातील भिगवणकडे जाणारी वाहतूक तीन हत्तीचौक- माळावरची देवी- जळोची- संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग किंवा विद्या प्रतिष्ठानची मागील बाजू ग. दि. मा सभागृह किंवा अभिषेक कॉर्नर- डावीकडे रुई पाटी ते भिगवण रोड तसेच भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक रुई पाटी-ग.दि.मा. कॉर्नर किंवा अभिषेक कॉर्नर-जळोची- माळावरची देवी-मोतीबाग कडून इंदापूर रोड किंवा वंजारवाडी येथील स्व. गोपिनाथ मुंडे चौक येथून डाव्या बाजुने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने जळोची मार्गे माळावरील देवी इंदापूररस्त्याकेड वळविण्यात येणार आहे.
पाटस रोड-देशमुख चौकाकडून येणारी वाहतूक रेल्वे ब्रीज उतरल्यानंतर यू टर्न मारुन रेल्वे रुळाच्या बाजूने मेहता हॉस्पीटल मार्गे- महिला हॉस्पीटल मार्गे एम.आय.डी.सी कडे वळविण्यात येणार आहे. पाटस रोड पालखी महामार्गाकडून एम.आय.डी.सी. कडे जाणारी वाहतूक विमानतळाच्या बाजूचा पालखी मार्ग-रेल्वे सर्कल-नवीन पालखी मार्ग तसेच भिगवण रोडकडून पाटसकडे जाणारी वाहतूक नवीन पालखी मार्ग रेल्वे सर्कल पुढे चार पदरी पालखी मार्गाने पाटस रोडकडे वळविण्यात येणार आहे.
तीन हत्ती चौक ते पेन्सील चौक ते वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणारा चौक असा दोन्ही बाजूचा मुख्य मार्ग वाहतुकीकरीता बंद करण्यात येणार असून मार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवाशी निवासस्थाने असून निवासस्थानातील नागरिकांची वाहतूक मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा रस्त्याने करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय चौक ते फेरारो कंपनी मुख्य प्रवेशद्वार पर्यंत असा पियाजो कंपनी बाजूकडील मार्ग वाहतुकीकरीता बंद करण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.