बारामतीत वाहतूक पोलिस ॲक्टिव्ह मोडवरती... एकाच दिवसात २३४ वाहने पकडली.. दोन लाखांचा दंड वसूल..!
बारामती वाहतूक पोलिसांनी २७, २८, २९ डिसेंबर या कालावधीत ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, वाहन परवाना जवळ न बाळगणे, दुचाक्यांना अवाढव्य आवाजाचे सायलेंसर बसवणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा अनेक कारणांवरून कारवाया केल्या. विशेष म्हणजे यात बुलेट गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून कारवाईची मोहीम राबवण्यात आली.
बारामती येथील कसबा चौक व न्यायालय कॉर्नर चौक, फलटण चौक व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे ही मोहीम राबवण्यात आली. वाहतूक पोलिसांनी या अगोदरही मोठ्या दंडात्मक कारवाया करून वाहतूक व्यवस्था व नियमांची अंमलबजावणी केली आहे. आता पुढचा कारवाईचा टप्पा बुलेट सायलेन्सर आणि त्याच्या फटका आवाजांवर असणार आहे असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. बारामती शहरातील काही भागात बुलेट गाड्यांचे सायलेंसर काढून फटाका आवाज काढतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करून दुचाकीवरून स्टंटबाजी करणे, महिला-मुलींना त्रास देणे असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा यादव यांनी दिला आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनखली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार अशोक झगडे, सुभाष काळे, पोलीस हवालदार प्रदीप काळे, महिला पोलीस हवालदार स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, माया निगडे, रेश्मा काळे, सीमा घुले, पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य कदम व आर.सी.पी पथकाचे पोलीस अंमलदार आदींनी केली.