मळद येथील तरुण शेतकऱ्याने घेतले एकरी १०१ टन उत्पादन

मळद येथील तरुण शेतकऱ्याने घेतले एकरी १०१ टन उत्पादन

 


बारामतीमळद येथील अभयसिंह घाडगे या तरुण शेतकऱ्याने एकरी १०१ टन उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्याने ऊस लागवड करण्यापूर्वी सोयाबीन व हरभरा ही पिके बेवड करण्यासाठी घेतली होती. यानंतर त्यांनी ऊस लागवडीसाठी को ८६०३२ या वाणाच्या टिश्यू कल्चर रोपांची निवड केली. ऊस लागवड करण्यापूर्वी सोयाबीन व हरभरा यांचा बेवड मिळाल्यानंतर माळेगाव कारखान्याच्या वतीने एकरी १२ टन मळी व दोन टन राख टाकून लागवड योग्य जमीन तयार केली.

शेतात पाच बाय दीड फूट अंतरावर को ८६०३२ जातीच्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. शेतीचे माती परीक्षणानुसार त्यांना रासायनिक खते दिली. ऊस लागवडीनंतर ५० व ९० दिवस झाल्यानंतर त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त, नत्रयुक्त, संजीवनी व सेंद्रिय खते, महाधनसह रासायनिक खते दिली. तसेच संपूर्ण ठिबक सिंचन वापरले.

काढणीस आलेल्या उसाच्या टिपऱ्या ३५-५२ इतक्या होत्या. तर, साधारणपणे एका उसाचे वजन साडेतीन ते पाच किलो दरम्यान होते. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होत असून, तो टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खत, जीवाणू व इतर खतांचा वापर केला पाहिजे असे अभयसिंह घाडगे यांनी महान्यूजशी बोलताना सांगितले. या शेतकऱ्याचे कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी सभासदांनी कौतुक केले आहे.