'उजनी'वर 'रोहित' पक्ष्यांचे आगमन; देश-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी ; पक्षी निरीक्षकात उत्साह

'उजनी'वर 'रोहित' पक्ष्यांचे आगमन; देश-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी ; पक्षी निरीक्षकात उत्साह

 


इंदापूर:- तानाजी काळे:- पुणे,सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर साकारलेल्या  सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी, तर देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची 'पंढरी' ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणफुगवठ्यावर ऋतू बदलाबरोबर विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे.
      
उजनी धरण यंदा काठोकाठ भरले असल्याने रोहित पक्ष्यांना उजनी काठी पानथळ दलदलीची जागा नसल्यामुळे त्यांची काही काळ पक्षी निरीक्षण व पर्यटकांना प्रतिक्षा करावी लागली होती. या आठवड्यात उजनी धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ होताच भिगवण - तक्रारवाडी नजीकच्या पाणलोट क्षेत्रात हक्काचा पाहुणचार झोडपण्यास हे पक्षी दाखल झाले आहेत.

उजनी धरण हे पंचेचाळीस वर्षांपूर्वी निर्माण होऊन नानाविध देशी,विदेशी पक्ष्यांचं आश्रयस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. दरवर्षी हिवाळ्यात व उन्हाळ्यात धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचा मोठा वावर या ठिकाणी पाहायला मिळतो. 

यावर्षी उशीरा का होईना, धरण परिसरात गेली काही दिवसापासून स्थानिक पक्ष्यां बरोबर हंगामी पक्षीही येऊन दाखल झाले आहेत.यंदा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरात बरसल्याने उजनी धरण काठोकाठ भरलेले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याने आच्छादित झाल्याने शिवाय वातावरणातील अस्थिरते मुळे नेहमी वेळेवर येणारे स्थलांतरित पक्षी यावर्षी काहीसे उशिराने आले आहेत. मागील काही दिवसांपासून समुद्र पक्षी(सी गल्स),चक्रवाक बदक (रूढी शेल्डक),परी बदक (नाॅर्दर्न शाॅवलर) सोनुला बदक (काॅमन टील),शेंद्री बाड्डा(पोचार्ड),मोरघार इत्यादी मत्स्याहारी पक्षी येऊन दाखल झाले आहेत.धरणाच्या काठावरील चिखलात आपली लांब चिमट्यासारखी चोच खुपसून जलक्रिमींना लक्ष्य करणारे टिलवा (स्टिंट),तुतुवार (सॅंड पाइपर),पाणटिवळा (गाॅडविट) इत्यादी 'वेडर पक्षी' दाखल झाले आहेत.  

जलाशय परिसरातील उघड्या भूभागावरील गवताळ प्रदेशात विविध ससाणे  (फाल्कन) भोवत्या (हॅरिअर),  ठिपक्यांचा गरूड (स्पाॅटेड ईगल),मधुबाज (हनी बझर्ड इत्यादी शिकारी पक्षीही येऊन दाखल झाले आहेत. 

स्थलांतरित पक्ष्यांसांठी उजनी पोषक 
१९७० च्या दशकात साकारले ल्या उजनीधरणातील पाणीसाठा सुमारे दहा किलोमीटर रुंद व दीडशे किलोमीटर लांब क्षेत्रात पसरला आहे.धरणाच्या काठावर विविध प्रजातींची झाडे झुडपे आहेत ; शिवाय पाणलोट क्षेत्रात ऊस,केळी,पपई,पेरू,चिक्कू व इतर फळबागा बहरलेल्या अस तात.या कारणांमुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रय व मुबलक खाद्य मिळते.जलाशयात विविधप्रकारचे मासे असल्यामुळे अनेक मत्स्याहारी पक्ष्यांना मासे उपलब्ध होतात.दलदल,पानथळ भागातील चिखल प्रदेशात तसेच पाणपृष्ठावर वाढणारी शेवाळ, जलकीटक शिंपले-गोगलगाय सारखे मृदुकाय कीटक,प्राणी, बेडूक व त्यांची पिल्ले,खेकडे इत्यादी पक्ष्यांचे खाद्यान्न विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्या मुळे धरण परिसरात मुक्तविहार करण्याच्या विहंगांना  पंचपक्वान्नच मिळते. 

देखण्या रोहितांचे आगमन होताच उजनीकाठ पक्षी निरीक्षक व पर्यटक, हौशी छायाचित्रकारांच्या हालचालींनी गजबजून जातो.

उजनी धरण परिसरात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांपैकी रोहित अर्थात' फ्लेमिंगो 'हे दिमाखदार  पक्षी पर्यटकांना नेहमी भुरळ  घालतात.त्यामुळे धरण परिसर पक्षीप्रेमींना नेहमी आकर्षण केंद्र ठरले आहे.हे पक्षी दरवर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या समूहाने येऊन पुढच्या तीनचार महिन्यांकरीता वास्तव्याला राहतात. यावर्षी ऋतुचक्रात बिघाड झाल्यामुळे या पक्ष्यांनीही आपला स्थलांतरित प्रवास लांबणीवर टाकला होता.

"पक्षांचा वावर वाढू लागला"
उजनी काठावर पक्ष्यांचा वावर सध्या वाढु लागला आहे.विविध बदके व शिकारी पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतआहे. पुढील काहीदिवसांनी धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जलाशयाच्या काठावर दलदल व चिखलयुक्त परिसर तयार होईल ; दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील पाणवठे पण  कोरडे पडतील. जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान उजनी धरण परिसरात विविध पक्ष्यांनी गर्दीने फुलून जाईल.

 ◼️🦩🦩 - स्वप्नील जराड    पक्षी निरीक्षक