उप प्रादेशिक कार्यालया मार्फत 'बारामती रस्ता सुरक्षा अभियान-२०२५' चे आयोजन
मंगळवार, ७ जानेवारी, २०२५
Edit
बारामती:- बारामती उप प्रादेशिक कार्यालया मार्फत ३१ जानेवारीपर्यंत 'बारामती रस्ता सुरक्षा अभियान-२०२५' अंतर्गत आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.
१ जानेवारी पासून झालेल्या कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले आहे.क्रोमा मॉल येथील कर्मचारी व नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन,चैतन्य इंटरनॅशनल विद्यालय,बारामती, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल,सुपे येथे विद्यार्थी व शिक्षकांना रस्ता सुरक्षा नियम, पादचारी सुरक्षितता,शालेय बसची सुरक्षित वाहतूक आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे 'रस्ता सुरक्षा काळाची गरज' याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली. शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगर येथे रस्ता सुरक्षा नियम व अधिनियमा बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेतली.
बारामती ॲग्रो साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तिका पट्टया (रिफ्लेक्टीव्ह स्ट्रीप्स) बसविण्या बाबत जनजागृती करण्या सोबतच वाहनचालकांना कर्कश्श आवाजात संगीत न वाजविण्याबाबत आवाहन करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील फिटनेस ट्रॅकवरील जड मालवाहतूक चालकांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आली.अग्निशामक चौक, एमआयडीसी मार्गावर हेल्मेट परिधान करणाऱ्या चालकांना गुलाब पुष्प देवून हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले.
'बारामती रस्तासुरक्षा अभियान -२०२५' करीता मोटार वाहन निरिक्षक बजरंग कोरवले,सूरज पाटील,प्रज्ञा ओंबासे,निरंजन पुनसे,प्रियांका सस्ते,हेमलता मुळीक,प्रियांका कुडले,मयुरी पंचमुख आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.अभियान यशस्वी पणे राबवून अधिकाधिक नागरिकांना रस्ते सुरक्षा विषयक नियंमाचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती श्री.निकम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.