सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत -- अजित पवार
मंगळवार, ७ जानेवारी, २०२५
Edit
बारामती:- बारामती तालुक्यातील सहकारी संस्थांनी काळाची पावले ओळखून उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण केले,त्यामुळे या संस्था भक्कम आर्थिक स्थितीत येऊ शकल्या. अन्य सहकारी संस्थांनीही या प्रमाणे आपले उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची गरज आहे,असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या मेडद येथील नवीन पेट्रोल पंप इमारतीचे व एमआयडीसी येथील पेट्रोल पंपाच्या नूतनीकरण इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.एचपी कंपनी,पुणेचे महाव्यवस्थापक सत्यनारायण चप्पा,गौरव अग्रवाल,राजवर्धन शिंदे, बाळासाहेब तावरे,ॲड.केशवराव जगताप,पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे,संभाजी होळकर, विश्वास देवकाते,सचिन सातव, जय पाटील,किरण गुजर, सुनील पवार,पोपटराव गावडे, दत्तात्रय येळे, रणजित तावरे, लचित परनाईक,वसंतराव घनवट,उत्तम जगताप, सरपंच गणेश काशिद,उपसरपंच आकाश बागाव आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये गैरप्रकारांना थारा देऊ नये, तरच संस्था चालू शकतील. बारामती
परिसरात भव्य शिवसृष्टी उभी राहत असून, त्यासाठी ६५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अन्य कामांसाठीही भरीव निधी दिला जात आहे. सहकारी संस्थांना केंद्र, राज्याच्या विविध योजनांतून निधी दिला जात आहे. परंतु या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होतो का हे पाहणे तेथील संचालक मंडळाची जबाबदारी आहे.
बारामती तालुक्याचा जिरायत हा शिक्का आगामी काळात पुसलेला दिसेल. त्यासाठी निरा-कऱ्हा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केली जात आहे. आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद केली जाईल.परिणामी, जिरायती भागाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल.शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्या साठी बाह्यवळण रस्त्यांचे नियोजन केले आहे.कांही ठिकाणी हे काम अडवले गेले आहे,त्यातून एकत्र बसून मार्ग काढला तरच विकासाला गती येईल.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे अध्यक्ष विक्रम भोसले यांनी कामांचा आढावा घेतला. उपाध्यक्षा सोनाली जायपत्रे व संचालक मंडळाने स्वागत केले. संस्थेचे व्यवस्थापक निलेश लोणकर यांनी आभार मानले.
वसुलीची जबाबदारी संबंधित अध्यक्षावर
संस्था चालविताना उचल देणे,उधारीवर माल देणे या बाबी घडतात.परंतु त्याच्या वसुलीची जबाबदारी संबंधित संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाची आहे.वसुलीकडे लक्ष न दिल्यास संस्था अडचणीत येतात.ते होऊ देऊ नका.त्यामुळे ज्या संचालक मंडळाच्या काळात असे व्यवहार झाले असतील त्यांच्यावरच यापुढील काळात वसुलीची जबाबदारी निश्चित केली जाईल,असे अजित पवार यांनी जाहीर केले.