कृषि प्रदर्शनाची इतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठीच भुरळ; आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा,गोव्यासह विविध भागातून शेतकऱ्यांची हजेरी

कृषि प्रदर्शनाची इतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठीच भुरळ; आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा,गोव्यासह विविध भागातून शेतकऱ्यांची हजेरी

 


बारामती:- रोजचं सकाळी आठ वाजल्या पासूनच महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक,गोवा,तेलंगणातील व विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी कृषिक प्रदर्शन पाहण्यास तुफान गर्दी केली आहे.माती विना शेतीचे प्रयोग, व्हर्टिकल शेतपिके,लाल पिवळी सुर्यफुले,हिरवी,रंगबेरंगी,कट फ्लाॅवर,२९ प्रकारची शेवंतीची फुले,देशविदेशातील फुले, पिक पध्दती पाहण्यास आलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

फार्मिंग,परदेशी फळ पिके, एक खोड डाळिंब,पेरू,शेवगा, परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान पाहून शेतकरी हरखून गेले होते. पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन असलेल्या या प्रदर्शनात देशी, विदेशी श्वानांचे स्पर्धेमध्ये यामध्ये इंडियन ब्रीड,टॉय ब्रीड यांचा समावेश होता. 


पशूंच्या स्पर्धेमध्ये कालवड स्पर्धा,खिलार वळू,लाल कंधारी वळू,गायी यांचा सहभाग होता.या स्पर्धेचे पंच क्रांतिसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग होते. या स्पर्धेचा निकाल सोमवार दि २० जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. तसेच दुध देणाऱ्या संकरीत गाईंची दुधाची स्पर्धा उद्या पर्यंत सुरु रहाणार आहे. पशु प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेला ११ कोटींचा डोळे व त्वचेचा रंग एकच असलेला मारवाडी घोडा,  शिंदे डेअरीचा दीड टनांचा रेडा, बन्नुर जातीच्या कनार्टक राज्या तील मेंढ्या,तीनफुट उंचीची  पोंगनुर गाय,५ फूट लांब शिंगे असलेली पंढरपुरी म्हैस शेतकरी आवर्जून पाहात होते.

प्रदर्शनात कृषि विज्ञान केंद्रा मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी माहिती घेतली व नाव नोंदणी केली.तसेच विविध पिकांच्या वाणांची माहिती घेण्या साठी शेतकरी कंपन्यांच्या स्टॉलवर मोठ्याच प्रमाणात गर्दी करताना दिसून आले. सदर कृषी प्रदर्शन आज सोमवार दि.२० जानेवारी पर्यंत निश्चित सुरु असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारीअधिकारी प्रोफे.निलेश नलावडे यांच्यातर्फे करण्यात आले असून कृषिकला पहिल्याच  दिवसापासून स्थानिक व राज्य आणि इतर राज्यातील शेतकरी वर्गाचा मोठाच प्रतिसाद मिळत आहे.



कृषि प्रदर्शनाची अभिनेते,नेत्यांनाही भुरळ

कृषि प्रदर्शनाला भाजपचे आमदार सुरेश धस,तसेच कोल्हापूरच्या संयोगिताराजे छत्रपती,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली.यावेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि विश्वस्त सुनंदा पवार यांनी त्यांना अधिक माहिती दिली. कृषिक प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही अगोदरच भेट दिली आहे.