९ वर्षाच्या पीयूषच्या खूनप्रकरणी पिता,आजी, चुलत्यास अटक; वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

९ वर्षाच्या पीयूषच्या खूनप्रकरणी पिता,आजी, चुलत्यास अटक; वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

 


बारामती :- तालुक्यातील होळ येथील पीयूष विजय भंडल कर या नऊवर्षीय बालकाचा निर्दयी पित्यानेच गळा दाबून व त्यानंतर भिंतीवर डोके आपटून खून केला. खुनाच्या घटनेनंतर परस्पर अंत्यविधी उरकण्याची तयारीसुद्धा केली.परंतु,वडगाव निंबाळकर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत अंत्यसंस्कार रोखला. मृतदेहाचे शवविच्छेदन करत पीयूषचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे उघड केले. या प्रकरणातील तिघांना १२ तासांत जेरबंद करत गुन्ह्याची उकल केली.
      
पीयूषचे वडील विजय गणेश भंडलकर, आजी शालन गणेश भंडलकर आणि चुलत चुलता संतोष भंडलकर या तिघांना पोलिसांनी अटक केली.विजय याने पीयूषचा खून केला.त्यानंतर या दोघांच्या साथीने त्याला चक्कर आल्याचे भासवत निरा येथील दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून पीयूषचा मृत्यू झाल्याचे सांगितले. होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह न्या, असेही सांगितले. तरीही या तिघांनी नातेवाइकांना पीयूष हा चक्कर येऊन पडल्याने मयत झाला असल्याचे सांगत अंत्यविधीची तयारी केली.

वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना याची माहिती दिली. वरिष्ठांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार काळे यांनी होळ येथील स्मशानभूमीत उपनिरीक्षक राहुल साबळे, हवालदार महेश पन्हाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, नागनाथ पारगे, नीलेश जाधव यांना पाठवले. पोलिस आल्यानंतर तेथे नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह
हलविण्यास नकार दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला.

उत्तरीय तपासणीत पियुष याच्या गळ्यावर दाब दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.परंतु,या अभिप्राया बाबत गुप्तता राखत पोलिसांनी पियुष याचा अंत्यविधी होण्या साठी मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला.अंत्यसंस्कार झाल्यानंतर एकेक संशयित ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी करत खुनाचा प्रकार उघडकीस आणला.
 
ही कामगिरी स.पोलिस निरीक्षक सचिन काळे,उपनिरी क्षक राहुल साबळे,सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, हवालदार अनिल खेडकर, सागर देशमाने, महेश पन्हाळे, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब मारकड, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, तौफिक मणेरी, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, भानुदास सरक, विकास येटाळे, नीलेश जाधव, प्राजक्ता जगताप, रजनी कांबळे, प्रियंका झणझणे आदींनी केली.