बारामतीतील फ्लेक्सबाजी होणार कालबाह्य; विद्युत फलक लावण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
बारामती:- शहरातील विविध ठिकाणी लावले जाणारे फ्लेक्स यापुढील काळात काल बाह्य होणार अशी चिन्हे आहेत. शहरातील प्रमुख ठिकाणी मुंबई पुण्याच्या धर्तीवर अत्याधुनिक इलेक्ट्रिक एलईडी फलक लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगर पालिका प्रशासनाला केल्या आहेत.
झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी या सूचना दिल्या आहेत. शहरात कोणतीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने हव्या त्या आकाराचे फलक लावण्याची पद्धत रूढ झाली आहे. या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे,पण अनेक व्यावसायिकांनाही या फलकांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.इंदापूर चैकातील रोजच लागणाऱ्या लहानमोठ्या अनेक फ्लेक्समुळे व अतिक्रमणांनी दुकाने दिसत नाहीत आणि मग त्याचा व्यवसायावरही विपरीत परिणाम होत भाडे भरणेही जिकीरीचे होत आहेत.फ्लेक्स फलकांबाबत कांही कायदा व नियम आहेत याचा विसर बारामतीकरांना व नगरपालिका प्रशासनालाही पडला आहे.नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाची दखल घेत शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच यात पुढाकार घेत आता नगरपालिकेला विद्युत फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर फलक बसवून त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. याबाबत काही तज्ज्ञांच्याही सूचना घेणार आहोत. शहरातील प्रमुख चौकात प्रथम असे फलक लावण्याचे नियोजन आहे. याबाबत मोठ्या शहरातील धोरणांचाही अभ्यास करण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- महेश रोकडे मुख्याधिकारी,बारामती नगर परिषद