
राज्य शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बारामतीचे बाळासाहेब मारणे; पुणे जिल्ह्याला प्रथमच संधी ; राज्य महामंडळ सभेत घोषणा
बारामती:- बारामतीच्या बाळासाहेब मारणे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाच्या गोंदवले (जि. सातारा) येथे झालेल्या महामंडळ सभेत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत या निवडीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या स्थापनेपासून प्रथमच पुणे जिल्ह्याला संधी मिळाली आहे.यासंबंधीची माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी महामंडळ सभेमध्ये करण्यात आल्या. या वेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील आदी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, घरभाडे भत्ता यांसह ग्रामविकास विभागाकडील सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू,असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
संभाजीराव थोरात यांनी मुख्यालयात राहण्याचा प्रश्न तसेच शिक्षक बदल्या,जुनी पेन्शन, वेतन आयोगाच्या त्रुटी यांसह १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना,कॅशलेस विमा या सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.
राज्य शिक्षक संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
महामंडळ सभेत अध्यक्षपदी बाळासाहेब मारणे (पुणे),कार्य कारी अध्यक्ष विलास चौगुले (कोल्हापूर),कार्याध्यक्ष संतोष कदम (रत्नागिरी) व किशन ईदगे (परभणी), कोषाध्यक्ष हंबीरराव पवार (सांगली), सरचिटणीस कैलास दहातोंडे [बीड] यांच्यासह महापालिका कार्यकारी अध्यक्ष पदी सचिन डिंबळे, केंद्रप्रमुख अध्यक्षपदी राजेंद्र जगताप, राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी राजेश काळभोर व आप्पासाहेब कुल यांची निवड करण्यात आली.
" न्याय्य हक्कासाठी आग्रही भुमिका "
राज्यभरात गुणवत्तापूर्ण शिक्षणात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी राज्य संघाची आग्रही भूमिका राहील.शिक्षक संघाच्या शाखा व उपशाखा यांना बळ देण्यात येईल...
- बाळासाहेब मारणे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ