बारामती पुणे लोकलसेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी

बारामती पुणे लोकलसेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी

 

बारामती:- बारामतीहून पुण्याला सकाळी व दुपारी रेल्वेची सेवा सध्या कार्यरत आहे, मात्र या रेल्वे ऐवजी मुंबईतील लोकलच्या धर्तीवर वेगवान गाडी सुरु करण्याती मागणी जोर धरत आहे.

विस्तारत असलेल्या बारामती - परिसराचे गेल्या कांही वर्षात वेगाने झालेले नागरीकरण,रस्ते वाहतुकीवरील वाढलेला ताण, वाहतूक कोंडीमुळे लागणारावेळ, रस्ते वाहतूकीचा वाढलेला खर्च विचारात घेता बारामती पुणे बारामती या मार्गावर रेल्वेने लोकल सेवा सुरु करावी अशी बारामतीकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.सध्या

बारामतीहून पुण्याला सकाळी व दुपारी रेल्वेचीसेवा कार्यरत आहे, मात्र या रेल्वेऐवजी मुंबईतील लोकलच्या धर्तीवर वेगवान गाडी सुरु करण्याती मागणी जोर धरत आहे.सध्या रेल्वेच्या प्रवासाला जवळपास सव्वा तीन तासांहून अधिकचा काळ लागतो,हा वेळ दोन तासांवर आणल्यास रेल्वे सेवा लोकप्रिय होईल,असे सर्वच स्तरातील नागरिकांना वाटते.    

बारामती पुणे व तीच सेवा पुढे लोणावळा,कर्जत पर्यंत कायम केली तर त्याला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल.गेल्या कांही दिवसात बारामती पुणे बारामती बसचा प्रवास फारच महाग झाला आहे.नुकत्याच झालेल्या भाववाढी नंतर बारामती पुणे हिरकणीचे तिकीट २३८रुपये व शिवशाहीचे तिकीट २६४ रुपये इतके आहे.पुण्याला जाऊन यायचे तर ४७६ रुपये हिरकणीला तर शिवशाहीसाठी ५२८ रुपये मोजावे लागतात.तर दुसरीकडे रेल्वेचा महिन्याचा पास अवघ्या ४४० रुपयात मिळतो. याचाच अर्थ महिनाभर दररोज रेल्वेने प्रवास केल्यास जाऊन येऊन पंधरा रुपयातच प्रवास होतो.तसेही रेल्वेचे बारामती पुणे तिकीट तीस रुपये आहे.हीतुलना बरेचकांही सांगून जाणारी आहे. बारामतीकर लोकलची मागणी कां करत आहेत ? हे गणित या आकडेवारीतच आहे.बारामती हून पुण्याला दैनंदिन कामकाजा साठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.अनेकांना बस पेक्षा रेल्वेचा प्रवास सुखकारक वाटतो,या पार्श्वभूमीवर बारामती- दौंड-पुणे अशी वेगवान लोकल सेवा सुरु केली तर बारामती करांना त्याचा सर्वाधिक लाभ होईल,अनेकजण दैनंदिन ये-जा करु शकतील.

दुपारच्या रेल्वेची वेळ बदलावी...

दुपारी बारामतीहून दौंडला जाणारी गाडी दुपारी बारा वाजता सोडली तर दौंडहून पुढे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस,इंदौर एक्स्प्रेस या गाडयांची कनेक्टिव्हीटी मिळू शकते,त्या मुळे दुपारी बारा वाजताच गाडी सोडावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

तिन्ही खासदारांकडे पाठपुरावा करु...

 ज्येष्ठ नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे व खासदार सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यापारी वर्गाची ही मागणी मांडून वेगवान लोकल सेवा सुरु करण्याबाबत पाठपुरावा करु.

- जवाहर वाघोलीकर सदस्य, स्थानिक रेल्वे सल्लागार समिती.

लोकलसेवा परवडणारी...

बारामती पुणे लोकलसेवा सुरु केल्यास व्यापा-यांना त्याचा अधिकचा फायदा होईल, प्रवासखर्चात बचत होण्यासोबतच मालही रेल्वेतून सोबत आणणे शक्य होते. वेळ कमी लागला तर रेल्वेला व्यापारीही प्राधान्य देतील. मुंबईला जोडणा-या गाडयांशी कनेक्टिव्हिटी केल्यास त्याचा अधिक लाभ होईल.

- सुशील सोमाणी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ.

सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल...

बारामती पुणे वेगवान लोकलसेवा सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल. सकाळी व संध्याकाळी वेळा व्यवस्थित असतील तर लोक रेल्वेचा प्राधान्य देतील. स्वताःची वाहने वापरण्याचे प्रमाणही कमी होईल.

संभाजी किर्वे, अध्यक्ष दि मर्चंटस असोसिएशन, बारामती.