बारामती-पंढरपूर एसटी प्रवासात ज्येष्ठाचे निधन

बारामती-पंढरपूर एसटी प्रवासात ज्येष्ठाचे निधन

 

बारामती :- बारामती- पंढरपूर एसटीमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.यावेळी चालक,वाहकाच्या अथक प्रयत्नानंतरही ते जीव वाचवू शकले नाहीत.रुग्णालयाच्या दारात पोहोचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले.

बारामती आगाराच्या सकाळी सातच्या बारामती- पंढरपूर बसने इतर प्रवाशांसह माळेगाव येथील दत्तात्रेय गोपाळ कोळी (वय ७१) हे प्रवास करत होते.एसटी सकाळी नऊच्या सुमारास बावडा जवळील एस.बी.पाटील शाळेजवळ आली.त्यावेळी दत्तात्रेय कोळी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याचे एसटीच्या महिला वाहक आरती गणेश जाधव यांच्या लक्षात आले.त्यावेळी त्यांनी चालक वाल्मीक राजे कुंभार यांना हे सांगितले. वेळेचे प्रसंगावधान राखत चालकाने एसटी बावडा येथील डॉ.जय विभूते यांच्या खासगी रुग्णालयाच्या दारात आणली. त्यावेळी डॉ.विभूते यांनी त्यांची तपासणी करून पुढील उपचारा साठी बावडा मल्टिस्पेशालिटी व आयसीयू सेंटर येथे हलविण्यास सांगितले.

बावडा मल्टिस्पेशालिटी व आयसीयू सेंटरमधील डॉ.गौरव ओंबासे,डॉ.भूषण चंकेश्वरा व डॉ. जय विभूते यांनी रुग्णाची हालचाल थांबली असतानाही सीपीआर व इतर उपचार व  शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुग्णाची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले. 

ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अन्य प्रवाशां सह रुग्णालयाच्या दारात थांबून होती.सह प्रवाशांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करूनही दत्तात्रेय कोळी यांचे निधन झाल्याचे समजताच प्रवासी स्तब्ध झाले. 

वाहक आरती जाधव यांनी दत्तात्रेय कोळी यांच्या कुटुंबियांना मोबाईलद्वारे ही घटना कळवली.