बारामतीमधील अकॅडमी चालकाचा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करतानाचा संतापजनक व्हिडिओ समोर

बारामतीमधील अकॅडमी चालकाचा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करतानाचा संतापजनक व्हिडिओ समोर

 


बारामती:- बारामतीत गेल्या काही काळात बेकायदेशीर अकॅडमींनी हैदोस घातला असून शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या या अकॅडमींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत. अशातच बारामतीत स्वत:ला एक्सेलन्स समजणाऱ्या एका अकॅडमी चालकाचा एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करतानाचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळं पोलिसांकडून या अकॅडमी चालकावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

बारामतीतील एका अकॅडमी चालकाने स्वत:ला एक्सेलन्स समजत अनेक अल्पवयीन मुलींना नशेचे पदार्थ आणि दारू पाजून अत्याचार केल्याची चर्चा गेली अनेक दिवस झडत आहे. अशातच या अकॅडमी चालकाचा एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हा अकॅडमी चालक एका अर्धनग्न मुलीशी अश्लील चाळे करताना दिसत आहे. तसेच ही मुलगी पूर्णपणे नशेत असल्याचं दिसत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

बारामतीत गेल्या काही काळात अकॅडमींच्या नावाखाली पालकांची लूट करण्याचे उद्योगच सुरू आहेत. शासनाच्या कोणत्याही नियमांना न जुमानता या अकॅडमी चालकांनी हैदोस चालवला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण हे गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. त्यांनी या अकॅडमींवर कारवाईच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन, उपोषण केली आहेत. मात्र संबंधित अकॅडमी चालकांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांसह काही एजंटांना हाताशी धरून तडजोड करण्यावर भर दिला जात आहे.

बारामतीत वाहनांच्या व्यवसायात असलेल्या एका पठ्ठयाने तर अकॅडमी सुरू केल्यापासून नवीनच उद्योग सुरू केल्याची चर्चा आहे. काही मुलींना विविध प्रकारच्या नशेची आणि दारूची सवय लावून त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रकार केला जात आहे. विशेष म्हणजे स्वत:च या मुलींसोबत व्हिडिओ तयार करण्याचा पराक्रमही या महाभागाने केल्याचं समोर आलं आहे. पालक गुणवत्तेसाठी लाखो रुपये अकॅडमी चालकांना देतात आणि अकॅडमी चालक अशा पद्धतीने वागतात. त्यामुळं आता शासनानं या अकॅडमी चालकांचा माज मोडीत काढण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी मोहसीन पठाण यांनी केली आहे.

दरम्यान, बारामतीतील अकॅडमीचालकाचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे. या अकॅडमी चालकाचे अनेक उद्योग सुरू असून तो पैशांच्या जीवावर मी काहीही करू शकतो अशाच आविर्भावात असतो. त्यामुळं त्याच्यावर कारवाई होणार की त्याला पाठीशी घातले जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.