
वकिलाच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर वनअधिकारी महिलेवर गुन्हा दाखल
बारामती:- एक राजकीय पक्षाशी संबंधित बारामती शहरातील वकिलानं चक्क घटस्फोटासाठी आलेल्या अशील महिलेलाच पटवलं. त्यांच्या प्रेमाची ही कहाणी वकिलाच्या पत्नीला कळताच तिनं अनेकदा संबंधित महिलेला समजावण्याचा प्रयत्नही केला. मात्र आता हाच माझा नवरा असं म्हणत तुला जे काही करायचं ते कर अशी धमकी देणाऱ्या वनअधिकारी असलेल्या या महिलेवर आता बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, बारामतीत एका राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय पदावर कार्यरत असलेले वकिल संबंधित वनअधिकारी महिलेने घटस्फोटाचा खटला चालवत होते. त्यातून त्यांच्यात कामाशिवाय गाठीभेटी वाढत गेल्या आणि संबंधित महिला या वकिलांना वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागल्या. याबाबत शंका आल्यामुळे वकिलांच्या पत्नीने या महिलेकडे विचारणा केली. तुम्ही विनाकारण माझ्या पतीला कशासाठी भेटता, त्यांना भेटवस्तू कशासाठी देता असं विचारल्यानंतर या महिलेने आमचे प्रेमसंबंध आहेत, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत असं सांगितलं.
एवढ्यावरच न थांबता आमच्या मध्ये आता कोणीही येवू शकत नाही, आमच्या फार वरपर्यंत ओळखी आहेत असं सांगत या महिलेने वकीलाच्या पत्नीला अक्षरश: धमकीच दिली. विशेष म्हणजे या महिलेने संबंधित वकिलाच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
त्यानंतरही ही महिला आणि वकिलाचे प्रेमसंबंध सुरूच होते. याचदरम्यान, ही महिला वकिलासोबत फिरत होती. त्यावेळीही वकिलाच्या पत्नीने पतीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळीही या महिलेने जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी या महिलेने संबंधित वकिलाच्या फोनवरुनही जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्या. या दोघांमध्ये नियमीत फोन, व्हिडिओ कॉल असा दिनक्रम सुरूच होता. यात बदल होत नसल्यानं वकिलाच्या पत्नीने थेट बारामती शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
वकिलाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी या वनअधिकारी महिलेवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३(१) r, ३(१) s, ३(२)va, भारतीय न्याय संहिता 2023 कलम ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत.