एमआयडीसीने घेतला बारामती विमानतळाच्या भूखंडाचा ताबा

एमआयडीसीने घेतला बारामती विमानतळाच्या भूखंडाचा ताबा

 

बारामती:- भाडेपट्टा करारनाम्याने वाटप केलेल्या भूखंडाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग केल्याने मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंड परत ताब्यात घेतला आहे. या भूखंडावर बारामती विमानतळ उभारण्यात आले आहे.

मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांना महामंडळाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे भूखंड वाटप केला होता. महामंडळाच्या भाडेपट्टा करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द करण्याबाबत टर्मिनेशन नोटीस महामंडळाकडून १६ जानेवारी २०२५ अन्वये बजावण्यात आलेली होती.

त्यानुसार मंगळवारी (तात. 8) या भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा घेतल्याची माहितीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली.

बारामती विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस आहे. या विमानतळाचा ताबा एमआयडीसी ने घेतल्यानंतर आता बारामती विमानतळाच्या सुधारणांना देखील वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाईट लँडिंगची सुविधा झाल्यानंतर बारामती विमानतळाचे महत्व अधिक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.